Skip to main content

सायकल : माझ्या जीवनप्रवासातील विश्वासू सहप्रवासी

आज, ३ जून – जागतिक सायकल दिन 🚲🌿🌍


संयुक्त राष्ट्रसंघाने सायकलचे आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत विकासातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली आहे. सायकल ही केवळ वाहतुकीचे साधन नसून आरोग्यदायी जीवनशैली, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रभावी माध्यम आहे. या निमित्ताने माझ्या जीवनप्रवासात सायकलने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेच्या काही आठवणी आणि अनुभव शब्दबद्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

सायकल हे माझ्यासाठी केवळ एक वाहन नव्हते, तर ती माझ्या जीवनप्रवासातील एक विश्वासू सहप्रवासी होती. बालपणापासून ते आजपर्यंतच्या माझ्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीत सायकलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) या गावात माझे बालपण गेले. लहानपणापासून शेतीची कामे, गावातील दैनंदिन व्यवहार आणि विविध ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर नित्याचा होता. त्यामुळे सायकल ही केवळ वाहतुकीचे साधन न राहता ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग बनली होती.

माझे आजोबा कै. दशरथ यादव तेलोरे हे रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी तेथे सायकल वापरण्यास सुरुवात केली होती. पुढे बदलीनंतर हीच सायकल ब्राह्मणी गावात आली. त्या काळात गावात सायकल असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. आजोबांची सायकल आणि त्यावरील त्यांची ऐट पाहण्यासारखी होती. गावकऱ्यांच्या नजरा अनेकदा त्या सायकलकडे वळत असत. नकळतपणे त्या सायकलविषयी माझ्या मनात आकर्षण निर्माण झाले आणि पुढे तीच माझ्या आयुष्याची सहप्रवासी ठरली.

सन १९९६ ते १९९९ या कालावधीत कला व वाणिज्य महाविद्यालय, सोनई (ता. नेवासा) येथे बी.ए. (भूगोल) शिक्षण घेत असताना मी दररोज ब्राह्मणी ते सोनई असा सायकलने प्रवास करत असे. ग्रामीण भागातील मर्यादित वाहतूक सुविधांमुळे सायकलच माझा खरा आधार होती. या दैनंदिन प्रवासाने वेळेचे नियोजन, शिस्त, चिकाटी आणि परिश्रमाची सवय माझ्यात रुजवली.

या काळात मिळालेल्या अनुभवांमुळे आणि अभ्यासातील सातत्यामुळे मला पुढे १९९९ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागात एम.ए. (भूगोल) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. मागे वळून पाहताना असे जाणवते की, सायकलने केलेल्या त्या प्रवासानेच माझ्या शैक्षणिक प्रगतीचा भक्कम पाया घातला.

एम.ए. पूर्ण झाल्यानंतर २००१ साली अहमदनगर महाविद्यालयात भूगोल विषयाचा व्याख्याता (सहाय्यक प्राध्यापक) म्हणून रुजू झालो. त्या काळातही जवळपास दोन वर्षे सायकलच माझ्या दैनंदिन प्रवासाचे साधन होती. शिक्षक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना सायकलने मला साधेपणा, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचे महत्त्व सतत जाणवून दिले.

सन २००३ मध्ये राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय, औंध (ता. खटाव, जि. सातारा) येथे नियमित व्याख्याता म्हणून रुजू झाल्यानंतर मी नवीन सायकल घेतली. त्या काळात परिसरात पाण्याची टंचाई होती. हातपंपावरून पाणी आणण्यासाठी ही सायकल मोठी मदतगार ठरली. दुष्काळी भागातील पाण्याच्या समस्यांचा जवळून अनुभव घेत असताना जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाविषयीची माझी संवेदनशीलता अधिक प्रगल्भ झाली.

याच अनुभवातून प्रेरणा घेऊन मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘भूरूपशास्त्र व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन’ या विषयात विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी २०१५ साली प्राप्त केली. एका साध्या सायकलने मला केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले नाही, तर संशोधनाची दिशा, सामाजिक बांधिलकी आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोनही दिला.

काळाच्या ओघात सायकलचा वापर कमी झाला. साताऱ्यात घराचे बांधकाम सुरू असताना प्लास्टरचे काम करणाऱ्या एका बिहारी कामगाराला मी ती सायकल दिली. मात्र त्याला एकच अट घातली—सायकलची योग्य काळजी घ्यायची. 

आजच्या वेगवान युगात सायकलचा वापर तुलनेने कमी झाला असला, तरी तिचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. सायकल हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर प्रवासाचा सर्वोत्तम मार्ग आहे. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम सायकलिंगमध्ये दिसून येतो.

– डॉ. नामदेव वसंत  तेलोरे

प्राध्यापक, भूगोल विभाग, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय, औंध, सातारा 

 https://vidwan.inflibnet.ac.in/profile/159877

🚲🌿🌍


Comments

Popular posts from this blog

What Was the First Name of Earth? Exploring Ancient Names Across Cultures

  Intro: Ever wondered what Earth was first called? While the planet we live on doesn’t have a “first name” in the traditional sense, various civilizations throughout history have given Earth meaningful names. These names often reflect cultural beliefs, mythology, and the deep respect ancient societies had for nature. Let’s explore some of the earliest and most fascinating names for our planet. 1. Gaia – The Earth as a Goddess in Greek Mythology In ancient Greece, the Earth was personified as Gaia, a powerful goddess representing the living planet. According to early Greek writings, particularly in Hesiod’s Theogony, Gaia was among the first deities to emerge from the chaos of creation. She gave birth to the sky, seas, and even the Titans. For the Greeks, Gaia wasn’t just a name—it was a symbol of life itself. 2. Terra – The Roman Counterpart of Gaia The Romans adopted much of Greek mythology, and their version of Earth was called Terra (or sometimes Tellus). She was worshipped as...

पर्यावरण संवर्धन : स्थानिक कृती, जागतिक परिणाम

सारांश पर्यावरण हे मानवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार आहे. तथापि, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर आणि हवामान बदल यांमुळे जागतिक पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मते, जैवविविधतेचा ऱ्हास, भूमी अवनती आणि हवामान बदल ही २१ व्या शतकातील प्रमुख पर्यावरणीय आव्हाने आहेत. जागतिक पर्यावरण दिन २०२६ च्या निमित्ताने पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, मानवी अतिक्रमणाचे परिणाम, युवक व नागरिकांची भूमिका, भारत सरकारचे प्रयत्न, भूगोलशास्त्राचे योगदान तसेच साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला परिसरात हरित सातारा टीमद्वारे राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. की-वर्ड्स (Key Words): पर्यावरण, शाश्वत विकास, हवामान बदल, जैवविविधता, अजिंक्यतारा, हरित सातारा, लोकसहभाग. १. प्रस्तावना दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानव पर्यावरण परिषदेनंतर या दिवसाची सुरुवात झाली. पर्यावरणीय समस्यांविषयी जनजागृती करणे आणि शाश्वत विकासासाठी जागतिक स्तरावर कृती घडवून आणणे हा या...